कोलंबो- आर्थिक संकटामुळे वाढत्या अशांततेमुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी देशात सार्वत्रिक आणीबाणी लागू केली. सार्वजनिक आणीबाणी जाहीर करणारा अध्यादेश जारी केला आहे. शुक्रवारी हजारो निदर्शकांनी थेट राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर तातडीने आणीबाणी जाहीर करण्यात आली.
श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरा जात आहे. देशातील स्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात चालली आहे. देशाच्या अनेक भागांत जनक्षोभ उसळू लागला आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि सरकारविरोधात लोक सातत्याने निदर्शने करत आहेत. वीज, पेट्रोल-डिझेल आणि वाहतूक सेवांवर वाईट परिणाम झाला असून, लोकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत श्रीलंकेतील जनता निराश होऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे.
देशाच्या विविध भागांत आंदोलनाचा वणवा भडकला आहे. पोलीस आणि संतप्त जमावामध्ये चकमकी झडत आहेत. संपूर्ण देशात तणावाचे वातावरण पसरले आहे. नागरिकांना गेल्या काही काळापासून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. वीजसंकटामुळे अनेक भाग अंधारात बुडाले आहेत. बस आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही डिझेल उपलब्ध नाही. सार्वजनिक वाहतूक कोलमडली आहे.
शुक्रवारी निदर्शकांनी आक्रमक होत थेट राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांच्या घरावर धडक दिली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. निदर्शकांवर अमानुषपणे लाठ्या चालवण्यात आल्या. ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे राष्ट्रपतींविरोधात जनतेत रोष आहे. जमावाने गुरुवारी त्यांच्या निवासस्थानासमोर हिंसक आंदोलनही केले. दरम्यान, पोलिसांना पाण्याच्या तोफा आणि लाठीमार करून जमावाला नियंत्रित करावे लागले. अखेरीस पुढील धोका लक्षात घेत राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आणीबाणीच्या निर्णयावर सरकारचे म्हणणे आहे की, देशाची सुरक्षा आणि सेवा व्यवस्थित चालण्यासाठी हे आवश्यक होते. श्रीलंकेत १ एप्रिलपासून आणीबाणीची स्थिती आहे. ढासळत्या आर्थिक परिस्थितीमुळे राष्ट्रपतींविरोधात जनतेत रोष आहे. जमावाने गुरुवारी त्यांच्या निवासस्थानासमोर हिंसक आंदोलनही केले. दरम्यान, पोलिसांना पाण्याच्या तोफा आणि लाठीमार करून जमावाला नियंत्रित करावे लागले.
परकीय चलनाची कमतरता
श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. 20 दशलक्ष लोकसंख्येचे बेट असलेला श्रीलंका हा देश स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात भीषण मंदीच्या संकटात आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी परकीय चलनाचाही तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे परिस्थिती इतकी बिकट आहे की बस आणि व्यावसायिक वाहनांसाठीही इंधन पुरेसे नाही. यासोबतच खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडत असल्याने पेपर खरेदी करता न आल्याने निर्माण झालेल्या टंचाईमुळे परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. अनेक भागात 14-15 तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अन्न, इंधन, वीज आणि गॅसची टंचाई निर्माण झाली असून आर्थिक मदतीसाठी मित्र देशांची मदत मागितली आहे.