अहमदाबाद : ‘वाघ बकरी चहा’ समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन (Parag Desai Pass Away) झालं आहे. ते 49 वर्षांचे होते. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून सावरताना पडल्यामुळे जबर जखमी होऊन त्यांच्या मेंदूला दुखापत झाली होती. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबासह संपूर्ण उद्योग विश्वावर शोककळा पसरली आहे. पराग देसाई यांच्या माघारी पत्नी विदिशा देसाई आणि कन्या परिषा असा परिवार आहे.
काय घडले होते?
गेल्या आठवड्यात मॉर्निंग वॉकला जात असताना पराग देसाई यांच्यावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात ते घरासमोरच पाय घसरुन ते पडले होते. सुरक्षारक्षकाने कुटुंबीयांना माहिती देताच त्यांना इस्पितळात नेण्यात आले. देसाई यांच्यावर शेल्बी रुग्णालयात उपचार सुरू होते. मेंदूला जबर मार लागल्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना झायडस रुग्णालयात नेण्यात आले. सात दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. परंतु काल सकाळी अहमदाबादमधील खासगी रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.
पराग देसाई हे वाघ बकरी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रस देसाई यांचे सुपुत्र होते. कंपनीच्या विक्री, विपणन आणि निर्यात विभागाची जबाबदारी त्यांच्यावर होती. कंपनीची दीड हजार कोटींची उलाढाल आहे. 1995 मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र ऐन उमेदीच्या भरातच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने संपूर्ण उद्योग विश्वावर शोककळा पसरली आहे.