नाशिक : नाशिक जिह्यातील (Nashik News) नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे बायपास परिसरात असलेल्या एका नाल्यातील डबक्यात एका तरुणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. घातपात होऊन त्याचे हातपाय बांधत पाण्यात फेकून दिले असावे, असा अंदाज नाशिक पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
हाती आलेल्या माहितीनुसार, गौरव संपत नाईकवाडे (27) रा. लहामटे मळा, दिंडोरी रोड, नाशिक असे मृत अवस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक- पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे बायपास लगत गेल्या दोन दिवसांपासून एक दुचाकी उभी असल्याचे नागरिकांना दिसून आले होते. परिसरातील कुणाची दुचाकी आहे, असा अंदाज आल्याने याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. या तरुणाचा मृतदेह फुगून वरती आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच वावी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता तरुणाचे हातपाय बांधून, तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला असल्याचे पोलिसांना दिसून आले. मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु आहे. गौरवचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला त्यावरून त्याच्यासोबत घातपात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.