नैऋत्य मान्सूनसंदर्भात भारतीय हवामान विभागाने (Monsoon News) नवीन अंदाज वर्तवला आहे. 25 सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे.
सध्या देशातील काही राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. मात्र, काही भागात पावसानं दडी मारल्याचे दिसत आहे. अद्यापही शेती पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीतच परतीच्या मान्सूनचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
23 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 24 ते 26 सप्टेंबर(रविवार ते मंगळवार) दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            