खासदार संभाजीराजे छत्रपती यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल होण्यास नकार

242 0

मुंबई- मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिलाय. मात्र, राजे उपोषणावर ठाम आहेत.

छत्रपती संभाजी राजे यांचे ब्लड प्रेशर, शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टर म्हणाले की, गेल्या 60 तासांपासून ते आमरण उपोषण करत आहेत. त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर कमी झालं आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी ते देखील घेण्यास नकार दिला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

कालपासून संभाजीराजे यांना तीव्र डोकेदुखीचा त्रासही जाणवत आहे. डॉक्टरांनी कालच सलाइन लावण्याचा सल्ला दिला. मात्र संभाजीराजेंनी सलाईन लावून घेण्यास नकार दिला. कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजे यांनी नकार दिल्याचं समजतंय. आत्ता थोड्या वेळापूर्वी पुन्हा एकदा आझाद मैदानावर रुग्णवाहिका दाखल झाली आहे.

हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा आहे. तो सुरूच ठेवणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजे यांच्या ट्वीटर हँडलवरूनही तसे ट्वीट करण्यात आले आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावर राजे यांच्या उपोषणाबद्दल बैठक सुरू झालीय. या बैठकीसाठी राजे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या बैठकीत आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!