नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तरुणपणी व्यावसायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने कर्जाला (Loan) कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील लवेश लॉरेन ऑरेंज सिटी टाऊनशिप (Lavesh Lorraine Orange City Township) या ठिकाणी ही घटना घडली आहे. आयुष अजय त्रिवेदी (26) असे मृत तरुणाचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आयुष त्रिवेदी हा सावनेर-कामठी परिसरात बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम करत होता. त्याच्याकडे काही ट्रक आणि पोकलँड होते. व्यवसायात तोटा झाल्याने आयुष गेल्या काही दिवसांपासून कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे तो तणावात होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत आयुषचे वडील अजय त्रिवेदी हे पत्रकार असून ते कामठी बस्ती येथे आपल्या कुटुंबासोबत भाड्याच्या घरात राहत होते.
घटनेच्या दिवशी मंगळवारी सकाळी घरातील सर्व सदस्य हॉलमध्ये बसले होते, त्यावेळी आयुष त्याच्या खोलीत होता. यादरम्यान अचानक त्याच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर घरच्यांनी खोलीकडे धाव घेतली असता आयुष रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आयुषने आत्महत्या करण्यासाठी वापरलेली बंदूक नेमकी कुठून आली याचा तपास पोलीस तपास करत आहेत.