घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून काळाबाजार करण्याचा प्रकार पुण्यात सुरु होता. हा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणून चौघांना अटक केली आहे.
हा प्रकार वडगाव बुद्रुकमधील तुकाईनगर भागात मंगल रिढे यांच्या खोलीमध्ये हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी रफिक सुलतान शेख (वय ३८), जमीर सुलतान शेख (वय ३६, दोघेही रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक), देवीसिंग रामसिंग राजपूत (वय ३६, रा. बिबवेवाडी), सद्दाम अजीज शेख (वय २९, रा. तुकाईनगर) यांना अटक करून ११४ गॅस सिलिंडर, ७ रिफिलिंग पाईप, रेग्युलेटर, २ टेम्पो १७ लाख २२ हजार ७०० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. पोलिस शिपाई संदीप कोळगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी सातारा रस्त्यावर एका गोदामात अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरले जात होते. त्यावेळी मोठी आग लागली होती.
पुण्यात कात्रज भागात अनधिकृतपणे गॅस रिफिलिंग सुरू असताना गॅस गळती होऊन २० गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याची घटना मागील वर्षी मार्च महिन्यात घडली होती.