पुणे : सध्या पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच मीडिया प्रतिनिधी या निवडणुकीची प्रत्येक अपडेट देण्यासाठी धडपडत असताना आता निवडणुकीतील मतदान मतमोजणीचे वार्तांकन करण्याच्या पासेससाठी डिजिटल मीडियाला डावलण्यात आले आहे. जिल्हा माहिती कार्यालयाने यापूर्वी फोटो आणि पासेस मागविले होते. तथापि आज जिल्हा माहिती कार्यालयातून डिजिटल मीडियाला पासेस नाकारल्याचे स्पष्ट करण्यात आलं, तसेच यामागचं नेमकं कारण देखील सांगण्यात न आल्यामुळे डिजिटल मीडिया मधून नाराजीचा सूर उमटतो आहे.
दरम्यान याबाबत डिजिटल मीडिया एडिटर जर्नलिस्ट असोसिएशनचे सदस्य शरद लोणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त केली आहे. या निवेदनामध्ये त्यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आता डिजिटल भारत सक्षम होत आहे. यापूर्वी राजेंद्र सरग नावाचे जिल्हा माहिती अधिकारी असताना त्यांनी पुण्यातील डिजिटल मीडियाला चांगले उत्तेजन आणि सहकार्य दिले आहे. त्यांच्यानंतर मात्र आता तशी परिस्थिती राहिली नाही. असे नमूद करण्यात आले असून विधानसभा लोकसभा निवडणुकीत डिजिटल मीडियाला मतदान मतमोजणी संदर्भात तसेच वेळोवेळी शासकीय स्तरावरून निवडणूक आयोगाच्या स्तरावरून देण्यात येणारे पासेस देण्यात येत होते.
डिजिटल मीडियाला आपण अशा प्रकारे डावलू नये. हवे तर आवश्यक ते जरूर निकष लावावेत. मात्र डिजिटल मीडियाला वार्तांकनासाठी सहाय्य करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपेक्षित केलेल्या डिजिटल इंडिया मधील डिजिटल मीडियाला भक्कम करण्यासाठी निराश करणार नाहीत अशी अपेक्षा या निवेदनातून शरद लोणकर यांनी व्यक्त केली आहे.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            