मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना त्यांनी माघार घेऊन त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. कालच नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा प्रचंड मतांनी विजय झाला आहे. यानंतर आता काँग्रेस पुन्हा तांबे पिता पुत्राचे निलंबन मागे घेणार का ? अशा चर्चा होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, “या विषयाचा निर्णय हाय कमांडच घेईल. त्यांचं निलंबन हे हाय कमांडच्या स्तरावर झालेला आहे मी कालही हे सांगितलं आहे. त्यामुळे हाय कमांडच्या निर्णयावर बोलणं बरोबर ठरणार नाही.
तसेच काल आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद ऐकत होतो. त्यांनी सत्यजित तांबे यांच्या विजयावर आनंद व्यक्त केला ज्यावेळेस मतदान झालं . त्यावेळी तातडीने त्यांचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर त्यांचे नेते असतील त्यांनी जाहीरपणे सांगितलं की, आम्ही सत्यजित तांबे यांना निवडून देणार आहोत. डॉक्टर सुधीर तांबे काही बोलले नाहीत. पण भाजपचेच लोक बोलले की, ते निवडून येतील.
ज्या पद्धतीने चाललं होतं देवेंद्र फडणवीस सत्यजित तांबे यांच्या विजयाचा आनंद व्यक्त करत होते. दुसऱ्याच्या घरात आग लावणं सोपं आहे. आता विदर्भात त्यांच्या घरात आग लावली, त्याचं काय? त्याचं उत्तर ते देणार आहेत का? असा प्रश्न यावेळी नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.