तिळगुळ घ्या गोड गोड बोला ! तिळगुळाचे गोड खुसखुशीत लाडू बनवण्याची सोपी रेसिपी

998 0

मकर संक्रांति निमित्त आता घराघरामधून तिळगुळाच्या खमंग लाडवांचा वास पसरायला सुरुवात होते. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ गुळ आणि दाणे यांच विशेष महत्त्व असतं. कारण हे तीनही पदार्थ शरीराला उष्णता देतात. चला तर मग पाहूया तिळगुळाचे खुसखुशीत लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य : पांढरे तीळ, शेंगदाणे, गुळ, तूप, वेलची पूड, गरजेनुसार पाणी

प्रमाण : एक वाटी तीळ, दीड वाटी दाण्याचा कूट, एक वाटी गूळ, दोन वाटी पाणी, एक मोठा चमचा वेलची पूड, दोन मोठे चमचे तूप

कृती : सर्वात प्रथम दाणे खरपूस भाजून घ्या आणि त्याचा ओबडधोबड कूट तयार करून घ्या. मिक्सरमधून फिरवण्यापेक्षा जर कुटून घेतला तर तुम्हाला चांगले टेक्श्चर मिळेल. त्यानंतर पांढरे तीळ कढईमध्ये हलके गुलाबीसर भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा तीळ जास्त भाजू नका. अन्यथा लाडू कडू लागेल. आता हे दोन पदार्थ एकत्र करून एका डिशमध्ये काढून घ्या. त्याच तापलेल्या कढईमध्ये आता तुपावर गूळ भाजून घ्यायचा आहे. अर्थात गरम कढईमध्ये गूळ घातल्यानंतर तो हळूहळू मेल्ट व्हायला लागेल. गुळ मेल्ट होत असतानाच त्यामध्ये जर गूळ एक वाटी असेल तर त्याच दोन वाटी भर पाणी घालून छान गुळ एकजीव पाक बनवून घ्यायचा आहे.

गुळ मेल्ट करताना पाणी घालायला विसरू नका. म्हणजे लाडू खुसखुशीत होतात आता गुळ चांगला मेल्ट झाल्यानंतर यामध्ये वेलचीची पूड घाला एकदा पुन्हा मिश्रण चांगले हलवून घ्या. आणि त्यामध्ये आता तीळ आणि दाण्याचं मिश्रण घाला. हे सर्व जिन्नस कढईमध्ये सातत्याने हलवत राहायचे आहेत. अगदी एक मिनिट हे मिश्रण सातत्याने हलवा आणि ताटामध्ये काढून घ्या. हलके कोमट झाल्यावर हातात घेऊन लाडू वळू शकाल तेव्हा हातावर तूप लावून छोटे छोटे लाडू बनवून घ्या तयार आहे तिळगुळाचे खुसखुशीत गोड लाडू…

Share This News
error: Content is protected !!