यशस्वी खेळाडूंना स्वत:कडून प्रत्येकी एक हजाराचे क्रीडा साहित्य देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा
पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय कला, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवातील पदक विजेत्यांना आपल्यावतीने प्रत्येकी एक हजार रुपयांचे क्रीडा साहित्य देण्यात येईल आणि प्रथम क्रमांक मिळविणारा खेळाडू वर्षभरात कुठेही खेळण्यासाठी गेल्यास त्याला रेल्वे किंवा विमानाचे तिकीटही काढून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे – बालेवाडी येथे आयोजित या उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, राज्याचे क्रीडा व युवक सेवा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या शोभा खंदारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले, देश बुद्धीमत्ता आणि आर्थिक क्षेत्रात पुढे जात असताना क्रीडा क्षेत्रात आपण मागे आहोत. इतर देशात शालेयस्तरावर खेळांना चांगले प्रोत्साहन देण्यात येत असल्याने ते देश आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी होतात. हे लक्षात घेऊनच देशपातळीवर खेळांना प्रोत्साहन देण्यात येत असून राज्यातही शालेय स्तरावर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक विजेत्यांना वर्ग एक अधिकारी म्हणून थेट नियुक्ती देण्यात येत आहे. खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून बघावे यासाठी त्यांना आवश्यक सुविधा व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा आणि खेलो इंडियाचेही आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा स्पर्धांसाठी निवड झाल्याबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करून प्रसाद म्हणाले, खिलाडूवृत्तीने सर्वांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे. या स्पर्धांमधून पुढे विभागीय, राज्यस्तरीय स्पर्धा व नंतर देशपातळीवरील खेलो इंडिया स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षणाधिकारी श्रीमती गायकवाड म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या केंद्र, बीट आणि तालुका स्तरावर स्पर्धा होऊन जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे. यामध्ये सुमारे १८ स्पर्धा घटक असून तालुक्यांचे संघ आणि वैयक्तिक स्तरावरील स्पर्धक मिळून ३ हजार ५११ विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून मुलांच्या सर्व कलागुणांना वाव मिळतो असेही त्या म्हणाल्या.
यावेळी खेळाडू विद्यार्थ्यांसमवेत पाटील यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू उमेश थोपटे यांनी खेळाडूंना क्रीडा प्रतिज्ञा दिली.