ठळक बातम्यापुणे

पुणे : धायरीतील इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आगीची घटना, २ जखमी VIDEO

पुणे : आज दिनांक १७•१२•२०२२ रोजी राञी ०७•४१ वाजता धायरी, डिएसके विश्वजवळ, गणेश नक्षञ को ऑप सोसायटी येथे आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच नवले व सिहंगड अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी इमारतीच्या ११ व्या मजल्यावर सदनिकेमधे (वन बीचके) आग लागल्याचे कळताच जवानांनी धाव घेत सदनिकेत प्रवेश केला. स्वयंपाक घरात घरगुती वापराच्या सिलेंडर मधून वायू गळती होऊन आग लागली होती. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पुर्ण विझवली व घरातील इतर दोन सिलेंडर बाहेर काढत धोका दुर केला.

सिलेंडर संपल्याने नवीन सिलेंडर जोडत असताना मोठ्या प्रमाणात वायू गळती होऊन जवळच असलेल्या पणतीमुळे आग लागून घरातील आरती राहुल साळवी – वय ३७ जखमी झाल्या असून त्यांना वाचवायला धावलेले राहुल दिलिप साळवी – वय ४० यांना देखील आगीची झळ लागली आहे. सदर दोन जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे. या आगीमुळे स्वयंपाक घरातील भिंतीला तडे जाऊन घरगुती साहित्याचे बरेच नुकसान झाले आहे.

या कामगिरीत नवले अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रकाश गोरे व तांडेल शिवाजी मुजूमले जवान भरत गोगावले, शिवाजी आटोळे विक्रम मच्छिंद्र, औंकार लोखंडे, आदित्य मोरे यांनी सहभाग घेतला.