चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा आम आदमी पार्टीने केला निषेध

651 0

पुणे : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा आम आदमी पार्टी तर्फे निषेध करण्यात आला. याबाबत आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“आज पुन्हा एकदा भाजपचे नेते व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते असे म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्यांनी भिका मागून शाळा चालवल्या. चंद्रकांत पाटील यांचे विधान निषधार्ह आहे. या सर्व महापुरुषांनी मोठ्या प्रयासांनी शाळा चालवल्या. मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. परंतु, त्यांच्या कार्याला भीख म्हणणे हे निषेधार्ह आहे.

खरं तर त्या काळात इंग्रजांचे सरकार होते, त्यामुळे महापुरुषांना आपल्या देशातील लोकांना शिक्षण मिळावं यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. परंतु स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती वेगळी आहे. स्वातंत्र्यानंतर लोकांचे राज्य आलेला आहे. आणि इथे शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु आता चंद्रकांत पाटील असं म्हणत आहेत की, सीएसआरच्या माध्यमातून शाळा चालवाव्यात. म्हणजेच या नेत्यांचे, या सरकारचे शिक्षणाकडे किती दुर्लक्ष झाले आहे हे समजते. शिक्षणाबाबत ते किती असंवेदनशील आहेत हेच यातून स्पष्ट होते. आम आदमी पक्ष या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध करत आहे.” अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी व्यक्त केली आहे.

Share This News
error: Content is protected !!