Pune : स्मारकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

262 0

पुणे : छत्रपतींचा स्वराज्याचा आणि देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास जनतेसमोर उभा करण्याचे काम पुरातत्व विभागाकडून व्हावे. शासन ऐतिहासिक वास्तू, किल्ल्यांच्या जतनकार्याबाबतीत अतिशय गंभीर असून त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले.

पुरातत्व विभाग पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत जागतिक वारसा सप्ताहानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालन कोथरूड येथे आयोजित राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन व दुरुस्ती कामांचे छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, पुणे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे आदी उपस्थित होते.

जुन्या वारशाचे शोधकार्य करणे, त्याचे जतन करणे आणि अभिमान म्हणून समोर मांडणे हे काम या प्रदर्शनातून होईल असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यातील मजबूत, सुरक्षित किल्ल्यांचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते. ते समोर आणण्याचे काम विभागाने करावे. या विषयाबद्दल समाजात कुतूहल असून या क्षेत्रात अजून खूप शोध घेऊन काम करण्याची गरज आहे.

बांधकामास घाईत परवानगी दिल्यास पुराण कालीन वास्तू, वस्तूंच्या जतनकार्यास बाधा येईल. त्यामुळे परवानगी देताना पुरातत्व विभागाने आवश्यक वेळ घेणे स्वाभाविक आहे. असेही पालकमंत्री म्हणाले.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगडाचे संरक्षण व जतनचे कामाच्या माहितीपटाचे अनावरण करून लघुचित्रफीत दाखवण्यात आली. २८ ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व त्याची माहिती असलेले पुस्तक पालकमंत्री श्री. पाटील यांना देऊन डॉ. वाहणे यांनी त्यांचे स्वागत केले.

या प्रदर्शनात राज्य संरक्षित स्मारके, गड किल्ले यांचे जतन व दुरुस्ती कामांची छायाचित्रे, किल्ल्यांचे त्रिमितीय रेखांकन (थ्री डी मॅपिंग) यांची छायाचित्रे, आराखडे पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Share This News
error: Content is protected !!