शिवसेना नक्की कोणाची ? याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये , असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तथापि शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय लवकरात लवकर लावावा, या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली आहे.
सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत. राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असताना, शिवसेना पक्षाचं चिन्ह याबाबत निकाल लागणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर मुंबईतील अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाले, त्यांच्या जागेसाठी देखील पोट निवडणूक होणार आहे. त्यामुळे पक्ष चिन्हाचा वाद लवकरात लवकर संपावा, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी अशी विनंती शिंदे गटाने केली आहे.