अर्थकारण : एखाद्याचे उत्पन्न प्राप्तीकराच्या सवलतीपेक्षा अधिक असेल तर त्याला प्राप्तीकर अधिनियम 1961 अंतर्गत प्राप्तीकर विवरण भरावे लागेल. परंतु दुर्देवाने व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे प्राप्तीकर विवरण भरण्याची गरज उरत नाही, असा विचार काहींच्या मनात येऊ शकतो. परंतु हे चुकीचे आहे. त्याचेही प्राप्तीकर विवरण भरावे लागेल. मात्र त्याची जबाबदारी ही त्याच्या कायदेशीर वारसावर येते. कायदेशीर वारसाला मृत व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्यामार्फत रिटर्न भरावेच लागेल. यासाठी कायदेशीर वारस या नात्याने ई फायलिंग पोर्टलवर (E Filing Portal) नोंदणी करावी लागेल.
नोंदणी आणि मंजुरी
अर्ज भरताना प्रतिनिधीकडे मृत व्यक्तीची महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे आणि काही माहिती देखील असणे आवश्यक आहे. यात मृत व्यक्ती आणि कायदेशीर वारसाचे पॅनकार्ड, न्यायालय किंवा पालिकेकडचे वारसाचे प्रमाणपत्र आणि मृताचे पेन्शन प्रमाणपत्र याचा समावेश असतो. सर्व कागदपत्रे जमा झाल्यानंतर कायदेशीर वारसाच्या अर्जाची तपासणी केली जाते. त्यानंतर ई-फायलिंग प्रशासकाकडून त्यास मंजुरी दिली जाते.
रिटर्न दाखल केले नाही तर
मृत व्यक्तीसाठी वारसाकडून रिटर्न भरले गेले नाही किंवा भरपाई दिली गेली नाही तर दंड होऊ शकतो. कायदेशीर वारसाने प्राप्तीकर अधिनियमाच्या कलम 139 मध्ये दिलेल्या तारखेपर्यंत किंवा त्याअगोदर रिटर्न दाखल केले नाही तर कलम 270 ए तंर्गत दंड आकारला जाईल. करदात्याने कर भरलेला नसेल तर त्याच्या 50 टक्क्यांएवढे दंड भरावा लागेल. वारसावर कलम 276 सीसीनुसार खटला देखील चालू शकतो. तसेच प्राप्तीकर विवरण वेळेत दाखल झाले नाही तर 276 सीसीनुसार तुरुंगातही जावे लागेल.
आयपी पसरिचा अँड कंपनीचे भागीदार मणीत पाल सिंह म्हणतात, की रिटर्न भरले नाही तर 234 एफनुसार विलंब शुल्क आकारला जाईल. तसेच कलम 234 अनुसार त्यावर व्याज आकारणी केली जाईल. त्याचबरोबर लपविलेल्या मालमत्तेचे कलम 148 नुसार आकलन केले जाईल. शेवटची तारीख उलटून गेल्यानंतर विवरणपत्र भरत असाल तर प्राप्तीकर नियमाच्या कलम 234 एफनुसार हजार रुपये (ज्यांचे उत्पन्न पाच लाखांपर्यंत आहे) किंवा पाच हजार रुपये (ज्यांचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा अधिक आहे) असा दंड संबंधितांना आकारला जाईल. करदात्यांना कलम 148 नुसार नोटीस देखील पाठविली जाईल. जोपर्यंत वडिलोपार्जित मालमत्तेपोटी कर भरला जातो, तोपर्यंत वारशाची जबाबदारी असते. परंतु ती मालमत्ता खासगी झाल्यानंतर तो वारसदार त्याची विक्री करतो किंवा त्यावर कर्ज घेऊ शकतो.
दोन रिटर्न भरणे गरजेचे
ज्या वर्षी मृत्यू झाला आहे, त्या वर्षी दोन वेगवेगळे रिटर्न भरावे लागेल. एक रिटर्न कायदेशीर वारसाला दाखल करावे लागेल. यात आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून ते त्या व्यक्तीच्या मृत्युपर्यंत झालेल्या उत्पन्नांचा समावेश करावा लागेल. दुसरे म्हणजे मृत व्यक्तीच्या ईस्टेटमधून झालेल्या उत्पन्नासाठी वारसदाराला रिटर्न भरावे लागेल. यात मृत झाल्याची तारीख आणि कायदेशीर वारसाला इस्टेट सोपविण्याची तारखेपर्यंत झालेल्या उत्पन्नाचा समावेश करावा लागेल. एखादी मालमत्ता जेव्हा कायदेशीर वारसाला सोपवण्यात येते, तेव्हा त्यापासून मिळणारे उत्पन्न हे वारसाचेच उत्पन्न मानले जाते.
या गोष्टी लक्षात ठेवा
रिटर्न भरणे हे अनेक परिस्थितीत फायदेशीर राहते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू आर्थिक वर्षाच्या मधल्या टप्प्यात होत असेल तर कायदेशीर वारसाला त्याचे रिटर्न भरावेच लागेल. कारण विमा दाव्याच्या वेळी हेच रिटर्न उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणून काम करते. रिटर्नमध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास त्याची जबाबदारी कायदेशीर वारसाची असते. कायदेशीर वारसाला रिटर्न दाखल करण्यापूर्वी संपूर्ण माहिती मिळवणे गरजेचे आहे. प्राप्तीकर विवरणात एखादी चूक होत असेल किंवा काही राहत असेल तर आर्थिक वर्ष संपण्याच्या तीन महिने अगोदर किंवा कर आकलन करण्यापूर्वी त्यात दुरुस्ती करता येऊ शकते.
यात दोन्हीपैकी जे अगोदर येईल, त्याला ही करण्याची संधी मिळेल. विलंबाने दाखल केलेल्या विवरणात देखील दुरुस्ती करता येते. गरजेनुसार अनेकदा दुरुस्ती करता येते. मृत्युच्या तारखेपर्यंत मृतकाचे उत्पन्न आणि वारसाचे उत्पन्न मिळून ते 50 लाखांपेक्षा अधिक होत असेल तर वारसाला आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याकडे असलेल्या सर्व मालमत्तेचे आणि व्याजाची, कर्जाची माहिती द्यावी लागेल. त्याचबरोबर रिटर्न दाखल केल्यानंतर मृतकाचा पॅनकार्ड देखील जमा करावा लागेल.
अशी नोंदणी करा
1. प्राप्तीकर ई फायलिंग पोर्टल
2. ऑथराईज्ड पार्टनर्स टॅबवर जावून ‘रजिस्टर एज रिप्रिझेंटिव्ह’ची निवड करा
3. ‘लेट्स गेट स्टार्टेड’वर क्लिक करा
4. नवीन डायलॉग बॉक्स कॅटेगिरी ऑफ असेस हू यू वाँट टू रिप्रेंझेंट सुरू होईल. त्यात डिसिज्ड (लीगल एअर) चा पर्याय निवडा.
5. नाव, पॅन, मृत्यू तिथी, कायदेशीर वारसाच्या खात्याची माहिती भरा. नोंदणीचे कारण आदी विवरण द्यावे लागेल.
आवश्यक कागदपत्रे अॅटॅच करा
6. विवरण भरल्यानंतर सुरवातीला प्रोसिड आणि नंतर ‘व्हेरिफाय द रिक्वेस्ट’वर क्लिक करा. शेवटी सबमिट रिक्वेस्टवर क्लिक करा