पुणे : पुणे पिंपरी चिंचवडसह राज्यातील तब्बल 18 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत . या महापालिकांमध्ये सध्या तीन सदस्यांची प्रभाग रचना निश्चित झाली असून , न्यायालय आता निवडणुकांचा कार्यक्रम केव्हा जाहीर करतील याकडेच सर्वांचे लक्ष आहे. मात्र राज्यात सध्या शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा चार सदस्यांच्या प्रभागाच्या मागणीने जोर धरला आहे.
भाजपने आग्रही भूमिका घेतली असल्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा एकदा चार सदस्य प्रभाग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी आणला जाणार असल्याचा देखील समजते आहे. त्यामुळेच या प्रस्तावाबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जातो ,याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागून राहिले आहे.
तथापि राज्यातील सर्व महापालिकांची अंतिम प्रभाग रचना आणि मतदार यादी जाहीर झाली आहे. त्यासह सर्वोच्च न्यायालयाने पुढील पंधरा दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत . त्यामुळे पुन्हा चार सदस्यांची प्रभाग रचना ही प्रक्रिया राबवणे अशक्य असल्याचं देखील बोलले जात असून, मंत्रिमंडळात आज हा प्रस्ताव मंजूर जरी झाला तरी त्याची प्रत्यक्ष महापालिका निवडणुकीत अंमलबजावणी होण्याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांकडून देखील संशय व्यक्त करण्यात येतो आहे.