उत्तराखंड : बद्रीनाथ मार्गावरील जोशीमठमधील घरांना का जात आहेत तडे ?

959 0

बद्रीनाथ : गावाकडच्या घराला फारफार तर पावसाळ्यात किंवा वादळात एखाद्या भिंतीला तडा जातो पण इथं अख्या गावाला तडा गेलाय. हो हिमालयाच्या कुशीत वसलेलं, बद्रीनाथच्या वाटेवर असलेलं जोशीमठ सध्या एका भयानक संकटाला तोंड देतंय. हे शहर जणू जमिनीत खचत चाललंय. 

जोशीमठ नेमकं आहे काय ? 

‘गेटवे ऑफ हिमालय’ नावानं प्रसिद्ध असलेल जोशीमठ हे उत्तराखंडचं एक पवित्र धार्मिक ठिकाण आहे. उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यात आदि शंकराचार्य यांनी स्थापन केलेलं हे तीर्थस्थळ आहे. 6150 फूट (1875 मीटर) उंचीवर असलेलं जोशीमठ हे हिमालयातील अनेक गिर्यारोहण मोहिमांचं, ट्रेकिंगच्या मार्गांचं आणि केदारनाथ-बद्रीनाथ सारख्या लोकप्रिय तीर्थक्षेत्रांच प्रवेशद्वार आहे.

जोशीमठाचं फक्त धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व नाही तर जोशीमठापासून भारत आणि तिबेटच्या सीमेचं अंतर फक्त 100 किलोमीटर आहे. भूस्खलनाचं प्रमाण असच वाढत राहिलं तर जोशीमठ परिसरात असलेल्या भारतीय सेनेच्या मुख्यालयाही फटका बसू शकतो. जोशी मठाची जमीन अचानक धसत असल्यानं इथले नागरिक प्रचंड घाबरले आहेत. जमिनीला आणि घरांना भेगा पडत आहेत. लोकं जीव मुठीत घेऊन आला प्रत्येक दिवस काढत आहेत.

जोशीमठ गावात 4500 इमारती आहेत , त्यापैकी 610 इमारतींना भेगा पडल्यानं त्या धोकादायक बनल्या आहेत. अन्य इमारतींचे सर्वेक्षण सुरू असून धोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याच भीतीमुळे लोकं रात्री मोकळ्या अंगणात आभाळाच्या छत्रछायेखाली आपली रात्र काढत आहेत.

जोशीमठात जमीन धसण्याची ही पहिली घटना नाही. या अगोदर 7 व्या दशकातही इथं जमीन धसत होती. याची कारणं शोधण्यासाठी 1970 मध्ये गढवालचे कमिशनर महेश मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक केली होती. या समितीने 1978 मध्ये दिलेल्या अहवालात जोशी मठ, नीती आणि माना घाटीत मोठ्या परियोजना सुरू करू नये असा अहवाल समितीने दिला होता. मात्र या अहवालाला केराची टोपली दाखवत या ठिकाणी बांधकामं सुरूच होती. नुकतंच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी या ठिकाणी भेट दिली. ज्या घरांना तडा गेला आहे त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.

जोशीमठ या ठिकाणी हे जे संकट ओढवलं आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत ?

  • गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात जलविद्युत प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि इतर बांधकामं वाढली आहेत.
  • मिश्रा समितीसह अनेक तज्ज्ञांनी सरकारला केलेल्या शिफारशीत या भागातील जंगलतोड थांबवणं आवश्यक आहे.
  • जंगलतोडीमुळे मातीची धूप वाढली आहे असं सांगूनही जंगलतोड थांबलेली नाही.
  • रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी खोदकाम किंवा ब्लास्ट करू नये, असं सांगूनही वारंवार होणाऱ्या खोदकामाचा जोशीमठावर परिणाम होतोय.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दाखल केलेल्या याचिकेत जोशीमठ संकटाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. या मुद्द्यावर उच्च न्यायालयात तत्त्वत: सुनावणी झाली पाहिजे, असंही न्यायालयाने म्हंटल आहे.

Share This News
error: Content is protected !!