मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आलेले पंजाबचे आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना अटक

186 0

चंदीगढ – भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे पंजाबमधील वातावरण ढवळून निघाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आप सरकारमधील आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सिंगला यांना अटक केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे कौतुक केले आहे.

नोकरीचे कंत्राट देण्यासाठी एक टक्का कमिशनची मागणी केली असल्याचा आरोप विजय सिंगला यांच्यावर करण्यात आला आहे. सिंगला यांच्याविरोधात लाच मागितल्याचे पुरावे देखील मिळाले आहेत. त्यामुळे पुराव्यांच्या आधारे भगवंत मान यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. त्यानंतर थोड्याच वेळात सिंगला यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

भगवंत मान यांच्या सरकारचं हे अत्यंत मोठं आणि धाडसी पाऊल असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. विजय सिंगला हे व्यवसायाने डेंटिस्ट आहेत. सिद्धू मुसेवाला यांना पराभूत करत त्यांनी मानसा मतदारसंघातून विजय मिळवला होता. आश्चर्याची बाब म्हणजे पंजाबचे आरोग्यमंत्री असताना विजय सिंगला यांनी २३ मार्च रोजी भ्रष्टाचार खपवून घेणार नसल्याची घोषणा केली होती. इतकंच नाहीतर भ्रष्टाचाऱ्यांवर शून्य सहनशीलता दाखवली जाणार असा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर अगदी ६२ दिवसांनी म्हणजेच २४ मे रोजीच ते स्वतःच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले.

मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हटले आहे की, आम आदमी पक्ष एका पैशाचाही भ्रष्टाचार सहन करणार नाही, मग तो आमच्या पक्षातील असेल किंवा बाहेरील. भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलनातून आमच्या पक्षाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास कायम ठेवण्याची जाबाबदारी आमच्यावर आहे. विजय सिंगला यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. भगवंत मान यांनी एक व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी केले भगवंत मान यांचे कौतुक

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे कौतुक केले आहे. “भगवंत तुमचा अभिमान आहे. तुमच्या कृतीने माझ्या डोळ्यात पाणी आले आहे. आज संपूर्ण देशाला आपचा अभिमान वाटतो, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. आम आदमी पक्षाच्या गळ्यावर सुरी चालवली तरी चालेल पण देशासोबत गद्दारी नाही हेच येथे सिद्ध झाले आहे असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. आम आदमी पार्टी हा कट्टर प्रामाणिक पक्ष आहे. तसेच जर आमच्यातील कोणी चोरी केली तर आपण त्यालाही सोडणार नाही, असा इशाराच त्यांनी आप पक्षातील नेत्यांना दिला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!