मुंबई- तुमच्यासोबत फिरण्यासाठी धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली. आता मी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. तुम्ही संघटनेवर जोर द्या . बाकीचं मी बघून घेतो, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील शिवसेना , जिल्हा संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “हिंदूंमध्ये फोडाफोड, महाराष्ट्रात मराठी-अमराठी असा वाद निर्माण करण्याची ही भाजपची चाल आहे.संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी आणि कशी फोडली? मुंबई आपण लढवून मिळवली. ती जनसंघाने फोडली. जागांसाठी ती फोडली. त्यावेळेला जनसंघाने फोडली यांना मराठी हिंदुत्वावर प्रेम नाही. त्यांना सगळ स्वतः करता हे हवं आहे. बाळासाहेब म्हणायचे जे कर्माने मरणार त्याला धर्माने काय मारायचे,?”
“शिवसैनिक अंगार आहे त्यामुळे भंगार आपल्याकडे बघणार नाही.गावातील जनतेला मदत करा. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. तुमच्या सोबत फिरण्यासाठी धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली आहे. जन्मापासून शिवसेनेकडे नविन तरुण रक्त आहे.गावागावातील शिवसैनिकांकडे सातत्याने लक्ष द्या, ” असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
लोकांसाठी कामं करा आणि संघटनेवर जोर द्या . माझ्या दौऱ्याचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल . तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.