‘…. म्हणून अंबादास दानवे मुख्यमंत्र्यांवर टीका करतात’, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

576 0

येत्या काळात राज्यात आणखी एक भूकंप घडू शकतो असे भाकीत करून उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. उदय सामंत सध्या अयोध्या दौऱ्यावर असून या ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार, खासदार सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी बोलताना उद्या सामंत म्हणाले, ” ठाकरे गटाचे नेते, छत्रपती संभाजीनगरचे आमदार आणि सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते असलेले अंबादास दानवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत” असे विधान करून खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांचा ओघ आणखी वाढणार आहे, असं भाकीत यापूर्वीच अनेकांनी केलंय. त्यात आता अंबादास दानवे यांचे नाव आल्याने चर्चांना उधाण आलंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून अंबादास दानवे यांनी तीव्र निशाणा साधला. एकनाथ शिंदे हे चोरलेला धनुष्यबाण घेऊन रामाच्या चरणी पूजा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर पहले मंदिर, फिर सरकार, अशी घोषणा अयोध्येत जाऊन दिली होती. मात्र हे चोरलेला धनुष्यबाण घेऊन जात आहेत. यात काय मर्दुमकी, असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय.

अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली असता उदय सामंत म्हणाले, ‘ अंबादास दानवे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं वातावरण आहे. शिंदे साहेबांवर टीका करणं त्यांना क्रमप्राप्तच आहे. पण मी शिंदे यांच्या संपर्कात नाही, हे दाखवण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे दुसऱ्याचं बघून फक्त टीका करतात. त्याला फार अर्थ नाही”

Share This News
error: Content is protected !!