नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून कडू राजकारणाला झालेली सुरुवात मोठ्या विघ्नाकडे वाटचाल करते आहे. काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांमधील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी आता राजीनामा दिला असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे.
बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेत्याचा राजीनामा दिला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या घडामोडी घडल्या त्यांचे खरे कारण आता समोर येते आहे. काँग्रेसमधील अंतर्गत खदखद बाहेर आल्याने बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचं लिहिले आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघातून विजयी झाल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवेळी चुकीच्या एबी फॉर्म वरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेत्याचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.