196 th Gunners Day :…म्हणून 28 सप्टेंबर हा दिवस गनर्स डे म्हणून साजरा केला जातो ; वाचा सविस्तर माहिती

254 0

सर्व तोफखाना दळे आणि सदर्न कमांडच्या तुकड्यांनी आज 28 सप्टेंबर 2022 रोजी 196 वा गनर्स डे साजरा केला. तोफखाना रेजिमेंटच्या इतिहासामध्ये 28 सप्टेंबर या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. कारण 28 सप्टेंबर 1827 रोजी 5(बॉम्बे) माउंटन बॅटरी या तुकडीची स्थापना झाली होती. स्थापना दिवसापासून या तुकडीने अखंडित सेवा बजावली असल्याने तिचा स्थापना दिवस गनर्स डे म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

आपल्या समृद्ध परंपरा आणि साहसी मोहीमांनी भरलेल्या वैभवशाली इतिहासाचा तोफखाना रेजिमेंटला अभिमान आहे. ज्या ज्या वेळी देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला त्या वेळी या रेजिमेंटने युद्ध जिंकून देण्यामध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. सध्या सुरु असलेल्या दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये असामान्य योगदान दिल्याबद्दल गनर्सनी सन्मान प्राप्त केला आहे.

युद्धाच्या आणि शांततेच्या काळात, त्याचबरोबर परदेशी शांती मोहिमांमध्येही देशाची सेवा करण्याचा रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आहे आणि व्यावसायिक उत्कृष्टता, निस्वार्थी समर्पित वृत्ती आणि कर्तव्याप्रति असीम निष्ठा यासाठी ती ओळखली जाते. अनेक प्रमुख संघर्षांच्या काळात आणि आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात या दळाने मानवतापूर्ण सेवा केली आहे.

युद्धभूमीवरील शौर्य आणि निष्णात व्यावसायिकतेचे दर्शन घडवणाऱ्या या रेजिमेंटने स्वातंत्र्यपूर्व काळात एक व्हिक्टोरिया क्रॉस, एक उल्लेखनीय सेवा आदेश, 15 मिलिटरी क्रॉसेस प्राप्त केले आणि स्वातंत्र्यानंतर एक अशोक चक्र, सात महावीर चक्र, सात किर्ती चक्र, 97 वीर चक्र, 68 शौर्य चक्र आणि इतर कितीतरी बहुमान मिळवले आहेत.

तोफखाना रेजिमेंटने स्वातंत्र्याआधी आणि नंतर अशा दोन्ही काळात सन्मानाचे 40 किताब मिळवले आहेत तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे असामान्य खेळाडू निर्माण केले आहेत. यामध्ये दोन पद्मश्री पुरस्कार विजेते, सात अर्जुन पुरस्कार विजेते, दोन पद्मभूषण आणि एक पद्मविभूषण पुरस्कार विजेत्याचा समावेश आहे.

अतिशय वेगाने एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणाऱ्या सामग्री वाहतूक प्रणालीसह आधुनिक शस्त्र प्रणाली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश यांच्या मदतीने भारतीय तोफखाना दळाचे एका आधुनिक युद्ध सुसज्ज दळामध्ये होणारे गतिमान परिवर्तन गनर्सना त्यांचे घोषवाक्य,“ सर्वत्र इज्जत ओ इक्बाल- सगळीकडे सन्मान आणि गौरव” सार्थ ठरवण्यासाठी मदत करेल.

याप्रसंगी सदर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल जे एस नैन, पीव्हीएसएम,एव्हीएसएम, एसएम यांनी तोफखाना रेजिमेंटने बजावलेल्या सेवेची प्रशंसा केली आणि कोणत्याही काळात आपली परिचालनक्षम सज्जता सर्वोच्च पातळीवर कायम राखण्याचे गनर्सना आवाहन केले.

Share This News
error: Content is protected !!