सर्वसामान्यांचा गृहप्रवेश प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

297 0

मुंबई : सन 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून आता ‘अमृत महाआवास योजना’ 2022 – 23 अभियानातील 5 लाख घरे पुढील 100 दिवसात बांधण्यात येणार आहेत. विक्रमी वेळेत घरकुले बांधली जाणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ चा राज्यस्तरीय शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे तसेच राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

सर्वांना घरे मिळावी यासाठी राज्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. यासाठी सर्वसामान्य लोकांना समोर ठेवून लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दर्जेदार आणि वेळेत घरे देण्यासाठी प्रयत्नशील रहावे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांच्या हातात हात घालून काम करतात, तेव्हा राज्याचा विकास वेगाने होत असल्याचे मत मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी व्यक्त केले.

बेघरमुक्त महाराष्ट्र करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण यामध्ये ग्रामीण विकास यंत्रणेने अतिशय चांगले काम केले आहे. अमृत महाआवास योजनेत मार्च 2023 पर्यंत 5 लाख घरकुले बांधण्यात येतील. बेघर आणि गरजू लोकांच्या व्यतिरिक्त जे नागरिक महाआवास योजनेच्या निकषात बसत नाहीत, अशा नागरिकांना निकषात बसण्यासाठी नवीन योजना तयार करून ‘बेघरमुक्त महाराष्ट्र’ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

राज्यातील बेघर व गरजूंना हक्काची घरे मिळावी यासाठी त्यांना जमिनी देणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, दिलेली उद्दिष्ट्ये वेळेत पूर्ण केली जाणार आहेत. ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे लाभार्थींना निधीचा पहिला हप्ता वेळेत दिला तर उर्वरित प्रकल्प जलदरित्या पूर्ण होईल. घरकुलांसाठी सध्या 5 ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण मार्टच्या माध्यमातून घरकुलांसाठी साहित्य उपलब्ध होत असल्याने नवीन इको सिस्टीम तयार झाली असल्याने यातूनही मोठा रोजगार निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

योजनांच्या माध्यमातून राज्याचा विकास – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून यू.के. सारख्या सक्षम अर्थव्यवस्था असलेल्या देशाला आपण मागे टाकले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसांचा विकास होत आहे. योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत प्राप्त होत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे ध्येय – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक पायाभूत सुविधा देऊन तेथील लोकांचे जीवनमान उंचविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे ग्रामविकास विभागाचे ध्येय असून ‘अमृत महा आवास अभियान’ हा विभागाचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या अभियानांतर्गत घरकुलांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार झाली पाहिजेत. 5 लाख घरांचा संकल्प मार्च 2023 पर्यंत आपणास पूर्ण करायचा आहे. उत्तर प्रदेशात 110 दिवसात घरे बांधली जात असून राज्याने 100 दिवसात घरकुले बांधण्याचे ध्येय ठेवले आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार आणि गतिमान घरे बांधली जाणार आहेत. यासाठी ग्रामसेवक, सरपंच यांच्यापर्यंत आढावा घेण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड नार्वेकर, ग्रामविकास मंत्री श्री.महाजन यांच्या हस्ते ‘अमृत महाआवास पुरस्कार-2023’ या पुस्तिकेचे, अभियान पोस्टर, महाआवास त्रैमासिक आणि अभियान गौरवगाथा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अमृत महाआवास अभियान संदर्भात राज्य शासनाने केलेली कामगिरी विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.राजेशकुमार आणि महाआवास अभियानाच्या संदर्भातील विस्तृत सादरीकरण ग्रामीण गृहनिर्माण संचालक डॉ. दिघे यांनी केले.

यावेळी उत्कृष्ट काम केलेल्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!