पुणे : कसबा विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणुकीपूर्वी, निवडणुकीच्या दिवशी आणि आता निवडणूक निकाल लागेपर्यंत कार्यकर्त्यांचा उत्साह अक्षरशः शीगेला पोहोचला आहे.
आमचा उमेदवार हरला तर मुंडन करेल अशी एका कार्यकर्त्यानं पैज लावली आहे. अशा अनेक भन्नाट पैज लावल्याच देखील कानावर येते आहे. आमचा उमेदवार विजयी झाला तर चहा पाजल किंवा आमचा उमेदवार विजयी झाला तर 500 ची पैज देखील लावली असल्याचं ऐकिवात येते आहे.
एकीकडे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे आपला गड राखण्यात यशस्वी होणार का ? ही धाकधूक असतानाच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आपल्या विजयाबाबत निश्चित आहेत. तर तिसरे उमेदवार हिंदू महासंघाचे आनंद दवे हे देखील प्रबळ उमेदवार आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात चुरशीची लढत झाली आहे.
एकीकडे प्रमुख पक्षांना धाकधूक असतानाच कार्यकर्ते मात्र एक से बढकर एक असे पैज लावताना दिसत आहेत. एका कार्यकर्त्यानी नवस देखील बोलला असून आमचा उमेदवार विजयी झाला तर 11 किलो पेढ्यांचा प्रसाद देणार असे देखील देवाला कबूल केले. आता देव कोणाचा नवस फेडून घेणार हे उद्या समजेलच.