कसब्याची चर्चा काही थांबेना ! रुपाली पाटलांनी घेतलेल्या भूमिकेवर तृप्ती देसाईंनी उघडलं तोंड… पाहा VIDEO

524 0

पुणे : दादागिरीची आणि शिवराळ भाषा करणाऱ्यांना राष्ट्रवादी तिकीट देईल, असं मला तरी वाटत नसल्याचा आरोप करत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी रुपाली पाटलांना टोला हाणला. भाजप आ. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागल्यास आपण लढण्यास इच्छुक असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी नुकतीच मांडली होती. 

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर काही दिवसातच रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीवरून पुण्यात राजकीय चर्चा सुरू झाल्या. अशातच ‘राष्ट्रवादी काँग्रेसनं मला आदेश दिल्यास मी निवडणूक लढवणार, अशी इच्छा रुपाली पाटील ठोंबरे यांनी बोलून दाखवली होती.

रुपाली पाटील यांच्या याच भूमिकेवर आक्षेप घेत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. रूपाली ठोंबरे या सोशल मीडियावर लाईक आणि व्ह्युज असणाऱ्या कार्यकर्त्या आहेत पण त्याचं मतात रूपांतर होऊ शकत नाही. मनसेनं त्यांना पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती तेव्हा सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला हजारो लाईक आणि व्हिडिओला लाखो व्हयुज होत्या परंतु पाच जिल्ह्यांतून मतांचा दहा हजारांचा टप्पासुद्धा त्यांना पार करता आला नव्हता. शिवाय वारंवार दादागिरी करणारा आणि तोंडात सततची शिवराळ भाषा असणारा कार्यकर्ता किंवा कार्यकर्तीला राष्ट्रवादी कसबा मतदारसंघातून उमेदवार म्हणून देईल, असं वाटत नाही, असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय.

पुणे महापालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी देखील या चर्चेत उतरून भाजपनं मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला तिकीट देऊन इतर पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, असं म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही घाईची चर्चा थांबावी, पुण्याच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणारं नाही, असं म्हणत या चर्चेला पूर्णविराम दिला जावा, असं म्हटलं होतं मात्र तृप्ती देसाईंनी रुपाली पाटलांविषयी तोंड उघडल्यानं ही चर्चा अजून तरी पूर्णविरामापर्यंत पोचू शकलेली नाही, हेच खरं !

Share This News
error: Content is protected !!