मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आल आहे. सातत्याने महापुरुषांचे होणारे अपमान याच्याच निषेधार्थ आजचा हा मोर्चा आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा हा मोर्चा मुंबईमध्ये निघालेला असतानाच भाजपने देखील मोर्चाचे आयोजन केला आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे देखील सहभागी झाले आहेत.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या मोर्चाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपने मोर्चाचे आयोजन केलं आहे. मात्र जनतेला सगळं काही माहिती आहे. ये पब्लिक है…! असं म्हणत छगन भुजबळ यांनी भाजपला ठणकवला आहे. ते म्हणाले की, मागील दोन महिन्यांपासून आम्ही मागण्या करत आहोत. मात्र सरकारने त्या ऐकल्या नाहीत. आता आंदोलनाच नियोजन केल्यानंतर भाजपने मागच्या दोनच दिवसात आंदोलन आयोजित केलं. आमच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये, असा भाजपचा डाव असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
तसेच महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य सातत्याने करण्यामागे भाजपचं मोठं षडयंत्र असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून राज्यात काय सुरू आहे हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीच्या आंदोलनावर फार परिणाम होणार नाही असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.