SPORTS : राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धांचे आयोजन

352 0

पुणे : जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने २४ ते २७ डिसेंबर २०२२ या कालावधीत म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जिम्नॅस्टिक्स हॉलमध्ये येथे राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे संजय शेटे, स्पर्धा संचालक योगेश शिर्के उपस्थितीत राहणार आहेत.

या स्पर्धांमध्ये अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ असे एकूण ९ विभागातून सुमारे ६५० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. मुंबई विभागातून आर्यन दवंडे, मानस मानकवळे, पुणे विभागातून सिद्धांत कोंडे, रिया केळकर, रितिषा ईनामदार, श्रावणी पाठक, शिवछत्रपती क्रीडाविद्यापिठाचे आर्या परब, याशिका पुजारी हे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडुंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची कौशल्ये जवळून पहाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने संकुलातील जिम्नॅस्टिक्स हॉल सज्ज करण्यात आलेला असून सहभागी खेळाडूंची निवास व्यवस्था संकुलातील वसतिगृहामध्ये करण्यात आलेली आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने दरवर्षी राज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी सुमारे ९३ खेळांचे, १४, १७ व १९ वर्षाखालील मुले व मुलींसाठी तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर या क्रमाने या स्पर्धचे आयोजन करण्यात येते. सन २०२२-२३ या वर्षीच्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक्स खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी पुणे जिल्ह्यास मिळालेली आहे. पुणे शहरातील नागरिक, क्रीडाप्रेमीनी राज्याच्या विविध विभागातून आलेल्या खेळाडूंचे स्वागत करावे. जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडू, नागरिकांनी खेळाडूंना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!