श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट; मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा साजरा

355 0

पुणे : शुभमंगल सावधान… चे मंगलाष्टकांचे सूर… राधे-कृष्ण, गोपाल-कृष्ण चा अखंड जयघोष आणि वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या महिला अशा पारंपरिक वातावरणात मंडईतील साखरे महाराज मठामध्ये तुळशीविवाह सोहळा पार पडला. वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण-तुळशी चरणी नतमस्तक होत, सुख-समृद्धी आणि आनंदी जीवनाचे मागणे मागत होती.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुळशीविवाह सोहळ्याचे. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, संतोष रसाळ, गजानन धावडे, विजय चव्हाण, तानाजी शेजवळ, साखरे महाराज मठाचे वंदना मोडक, वनिता मोडक, सोनिया मोडक आदी उपस्थित होते.

शामसुंदर पारखी शास्त्री यांनी विवाहसोहळ्याचे पौरोहित्य केले. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला. तुळशी वृंदावन आणि श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन रथातून मिरवणूक काढण्यात आली. दरबार ब्रास बँड मिरवणुकीत वादन करत होते.

चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करत, श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर विवाह समारंभ झाला. उपस्थित भाविकांनी श्रीकृष्ण-तुलसीचे दर्शन घेतले.

भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. तुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide