नाशिक- नाशिक-औरंगाबाद मार्गावर निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे शिवशाही बसला आग लागून ही बस भस्मसात झाली. ही घटना आज घडली. बस औरंगाबाद येथून ही गाडी नाशिककडे जात असताना ही घटना घडली. सुदैवाने बसला आग लागण्यापूर्वीच प्रवाशांना बसमधून उतरवण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
औरंगाबाद येथून ही गाडी नाशिककडे जात असताना येवला तालुक्यातल्या देशमाने येथे ही गाडी अचानक बिघडली. बसमधून जवळपास दहा ते पंधरा प्रवासी प्रवास करत होते. मात्र, बस बंद पडल्याने त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवून देण्यात आले होते. त्यानंतर बिघडलेल्या बसने पेट घेतला. आगीचे कारण सध्या स्पष्ट नसले, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
यापूर्वीही राज्यभरात अनेकदा शिवशाही बसला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्यानंतरही या घटना घडत आहेत. शिवशाही बसमध्ये काही दोष असतील आणि त्रुटी असतील तर त्या तात्काळ दूर कराव्यात. अन्यथा हे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे महागात पडेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मागील महिन्यात सांगलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर चालकाने ही बस रस्त्याच्या कडेला उभी केली. बसमधील प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. अग्निशमन दलाच्या दोन गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.