नवी दिल्ली- शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे. या सरकारचे निर्माते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घडामोडींवर पत्रकार परिषद घेऊन या घडामोडींवर बोलताना यातून कोणता तरी मार्ग निघत असा आशावाद प्रकट केला.
शरद पवार म्हणाले, ” नेमकं काय झालं याची माहिती घेतली जात आहे. मागील अडीच वर्षांपासून सरकार चालत असल्याने हे षडयंत्र रचले गेले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याआधीदेखील असं झालं होतं. त्यावेळी काही आमदारांना हरयाणात ठेवण्यात आलं होतं ” असेही पवार यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. पण त्यांना मुख्यमंत्रिपद द्यावं की नाही द्यावं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यातून कोणता कोणता तरी मार्ग निघणार आहे, अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
भाजपसोबत सरकार स्थापन करणार का ?, असा प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी थेट उत्तर देण्याचे टाळत ‘सेन्सिबल’ प्रश्न विचारा असेही त्यांनी पत्रकारांना म्हटले.
विधान परिषद निवडणूक निकालावर नाराज नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले. विधान परिषदेसारख्या निवडणुकीत अनेकदा क्रॉस मतदान होते. मात्र, त्यातून सरकारला फारसा धोका निर्माण होत नाही. अशा निवडणुकांमध्ये विपरित निकाल लागला तरी अनेक वर्ष सरकार राहिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडाळीवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चर्चा केली. त्याशिवाय, अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली.