नागपूरचे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, कोण आहेत सतीश उके? (व्हिडिओ)

671 0

नागपूर – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे नागपूरचे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. मात्र या छापेमारी मागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सतीश उके हे नागपुरचे हायप्रोफाईल वकील आहेत. 

पार्वती नगर भागातील निवासस्थानी आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सध्या ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी आहेत. नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं. अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तिवाद केला आहे. सतीश उके यांच्या घरावर ईडीने धाड टाकण्याने उके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

कोण आहेत सतीश उके ?

सतीश उके हे नागपुरचे हायप्रोफाईल वकील आहेत. सतीश उके यांची राजकीय वर्तळात उठबस आहे. त्यांचे राज्यातील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. उके पूर्वीपासूनच जमिनी गैरव्यवहारप्रकरणी नागपूर पोलिसांच्या रडारवर आहेत. 2018 साली त्यांना एका जमीन गैरव्यवहारप्रकरणी अटकही झाली होती. एका वृद्धेला धमकावून त्यांची दीड एकर जमीन स्वतःच्या आणि स्वतःच्या भावाच्या नावावर केल्याचा आरोप उके यांच्यावर आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्हे लपवल्याच्या विरोधात उकेंनी याचिका दाखल केली होती. नितीन गडकरींसह इतर भाजप नेत्यांविरोधातही उकेंकडून याचिका दाखल करण्यात आली होती. तेलगी घोटाळ्यातही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा सहभाग असल्याचा आरोप उके यांनी केला होता. यासंदर्भात उकेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेले होते.

Share This News
error: Content is protected !!