मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याआधी त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना न्यायालयाने कारागृहातून गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याची परवानगी दिली.
सरकारी वकिलांनी न्यायालयात आज अनेक धक्कादायक खुलासे केले. सदावर्ते यांनी मुद्दाम कर्मचाऱ्यांकडून छोटी रक्कम गोळा करुन दोन कोटी रुपये जमवले. ती रक्कम त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. पण आता जयश्री पाटील या फरार आहेत, असा धक्कादायक दावा सरकारी वकिलांनी केला आहे. संबंधित प्रकरण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील हल्ल्याच्या प्रकरणावरुन आता आर्थिक घोटाळ्याच्या दिशेला वळत आहे, असंही सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं.
सदावर्ते यांची पोलीस कोठडी संपली. त्यानंतर आज सदावर्तेंना न्यायालयात हजर करण्यात आले. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.