पुणे – मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या ‘ओरा स्पा’ सेंटरवर पोलिसांच्या सुरक्षा विभागाने कारवाई केली. या कारवाईत स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करून सहा पीडित महिलांची यावेळी सुटका करण्यात आली. औंध येथे ही कारवाई करण्यात आली.
सागर श्याम पवार (वय-३२ वर्षे, रा. गवळीवाडा, लोणावळा, ता. मावळ जि. पुणे) असे अटक केलेल्या मॅनेजरचे नाव असून या प्रकरणातील आणखी एक आरोपी मनीष ईश्वर मुथा (रा. कोढवा, पुणे) आणि राहुल जिगजिनी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर हद्दीमध्ये मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली राज्यातील तसेच परदेशातील मुली ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांकडून बनावट गिऱ्हाईक पाठवून या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सामाजिक विभागाच्या गुन्हे शाखेने छापा टाकून मॅनेजरला अटक केली. यावेळी दोन परराज्यातील भारतीय महिलांची आणि थायलंड या देशातील एकूण चार महिलांची सुटका करण्यात आली.
या कारवाईत ८१ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चतुशृंगी पोलीस करत आहेत.