पुणे – राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेनंतर पुण्यातील मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पाठराखण केली आहे.
रुपाली पाटील यांनी म्हटलंय की, बहीण म्हणून मी वसंत मोरे यांच्या पाठीशी आहे. त्यांनी जी भूमिका घेतली, ती योग्यच आहे, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. राज ठाकरेंना भाजपाने बोलायला लावले. राज ठाकरेंची सभा ही भाजपाची होती. भाजपाने हे घडवून आणले आहे, अशी टीका रुपाली पाटील यांनी केली आहे.
शरद पवारांमुळे जातीवाद वाढला असा आरोप राज ठाकरे यांनी केला तर मग हसन मुश्नीफ, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे मंत्री असते का, असा सवाल रुपाली पाटील यांनी केला आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर नाराज झालेल्या मनसेच्या काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले. यावर वसंत मोरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी या कार्यकर्त्यांची भेटही घेतली. फेसबुक पोस्टही केली. एखाद्या किल्ल्याचे बुरूज ढासाळायला लागले ना, की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही, त्यांच्या या वाक्याचे वेगवेगळे संदर्भ घेतले जात आहेत. हा अप्रत्यक्ष इशाराही मानला जातोय.