पुणे तिथे दंडही नाही उणे ! पुणेकरांनी बेशिस्त वाहन चालविण्यासाठी दिला १५ कोटी दंड

714 0

पुणेकर दंड भरण्यामध्ये देखील स्वतःला मागे ठेवत नाहीत. वाहन चालवताना नियमाची पायमल्ली करत हजारो पुणेकरांनी दंडाच्या स्वरूपात प्रादेशिक परिवहन विभागाला कोट्यवधींचा महसूल मिळवून दिला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या २० हजार वाहनांवर कारवाई करून या वाहन चालकांकडून १५ कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

पुणे आरटीओ कार्यालयाची चार वायुवेग पथके आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन ही पथके कारवाई करतात. शहरात वाहतूक पोलिसांकडून जास्त कारवाई होत असल्यामुळे प्रामुख्याने शहराच्या बाहेरील मार्गावर पथकांकडून जास्त कारवाई केली जाते. पुणे शहरातच नाही तर पुणे शहराच्या बाहेरील मार्गावर वायुवेग पथकाची करडी नजर आहे.

आरटीओच्या वायुवेग पथकांनी २०२२-२३ आर्थिक वर्षात २० हजार ४८२ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामधून आरटीओला १५.२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. २०२१-२२ मध्ये पुणे आरटीओच्या वायुवेग पथकांनी केलेल्या कारवाईत १० कोटी ५९ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा पाच कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई वाढली आहे. वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या प्रत्येकावर वाहतूक पोलिसांची नजर असणार आहे. वाहतूक पोलिसांच्या रडावर पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी, वकील आणि पत्रकार देखील आले आहेत. त्यांच्यांकडूनही वाहतूक पोलिसांनी दंड वसूल केला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात पुणे आरटीओने सर्वाधिक कारवाई (५,९०३ वाहने ) विमा नसलेल्या वाहनांवर केली आहे. त्यानंतर हेल्मेन न घालणे, सीटबेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनातून प्रवाशांची वाहतूक करणे, क्षमतेपेक्षा जास्त माल भरणे, रिफ्लेक्टरशिवाय वाहन चालविणे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे अशा प्रकारांत कारवाई केली आहे. यातील बहुतांश कारवाई महामार्गावर करण्यात आली आहे.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत. शहरातील चौका- चौकात पुणे वाहतूक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यामुळे गेल्या पंधरा दिवसांत पुणे शहरात 795 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!