पुणे : पुण्यातील रोपण ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सुयश प्लाझा, भांडारकर रोड या कंपनीने महाराष्ट्र राज्याच्या अथवा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचा कोणताही परवाना नसताना बाईक आणि टॅक्सीसेवा सुरू केली. पुणे शहरासह राज्यभरात विनापरवानगी आणि बेकायदेशीर ऑनलाईन ॲप सुरू करून ही सेवा सुरू होती. ऑनलाईन ऍप वरून प्रवाशांची बुकिंग करून बेकायदेशीर रित्या प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी कंपनीचे मालक जगदीश पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात सुरू असलेल्या या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवेच्या विरोधात रिक्षा संघटनांनी बंद पुकारला होता. यास पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा संघटनेने देखील पाठिंबा दिला. या आंदोलनापूर्वीच बेकायदेशीर सर्विस देणाऱ्या बाईक टॅक्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बंड गार्डन पोलीस ठाण्यात पुणे आरटीओतील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत रामराजे भोसले यांनी तक्रार दिली आहे.