नवी दिल्ली – महाराष्ट्रासह देशभरातील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी 10 जूनला मतदान होत आहे. ही निवडणूक प्रक्रिया कशी होते याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये असते. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जुन ते ऑगस्टमध्ये अनेक राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे या जागांसाठी काही नवे चेहरे चर्चेत आहेत, तर काहींनी पुन्हा एकदा दावेदारी ठोकली आहे. सध्या महाराष्ट्रात देखील राज्यसभेच्या जागांवरून राजकारण पेटले आहे. अलीकडेच राज्यसभेचा कार्यकाळ संपलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना पुन्हा एकदा राज्यसभा सदस्य होण्याची इच्छा आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना साद घातली. मात्र शिवसेनेने शिवबंधन बांधल्याशिवाय राज्यसभेसाठी पाठिंबा मिळणार नाही अशी अट त्यांना घातली. संभाजीराजे यांनी त्याला नकार देऊन अपक्ष लढण्याचा निर्धार केला.
त्यानंतर शिवसेनेने आपल्या कोट्यामधील दोन जागांपैकी एक जागेवर संजय राऊत यांना तर दुसऱ्या जागेवर कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. एकूणच या निवडणुकीला खूप महत्व आले आहे.
अशी होते निवडणूक
राज्यसभेत एकूण सदस्य संख्या २५० आहे. तथापि, यामधील १२ सदस्य हे राष्ट्रपती नियुक्त असतात. उर्वरित २३८ सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करतात. यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जागांचे वाटप केले जाते. राज्यातील लोकसंख्येच्या आधारावर कोणत्या राज्याला किती जागा मिळणार हे निश्चित केले जाते. अर्थातच, ज्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे त्या राज्याला अधिक जागा मिळतात. उत्तर प्रदेश सर्वात मोठे राज्य असल्याने त्या राज्याला सर्वाधिक ३१ जागा मिळतात.
राज्यसभा सदस्याची निवड करताना एक प्रतिनिधी एका वेळेला एकाच उमेदवाराला मतदान करू शकतो. तथापि, अपवादात्मक परिस्थितीमध्ये मत ट्रान्सफर सुद्धा होऊ शकते. समजा, ज्या उमेदवाराला मत देण्यात आलं आहे तो उमेदवार विजयी झाला असल्यास ते मत ट्रान्सफर केलं जातं. आणि दुसऱ्या उमेदवाराला इतकी कमी मते मिळाली आहेत त्यामध्ये तो विजयी होऊ शकत नाही अशावेळी मत ट्रान्सफर होऊ शकतं. त्यासाठीच प्राथमिकता ठरवून उमेदवारांना 1 पासून 4 पर्यंत नंबर दिले जातात.
पहिल्यांदा प्राथमिकता असलेल्या मतांनाही एक नंबर निश्चित केला जातो. म्हणजेच याचा अर्थ असा की, एका उमेदवाराला विजयासाठी किती आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे हे राज्यसभेच्या किती जागांवर निवडणूक होत आहे यावर निश्चित केले जाते. यासाठी जो फॉर्म्युला असतो तो असा असतो की राज्यातील एकूण आमदारांच्या संख्येला राज्यसभेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या आकड्याला १ जोडून भागले जाते. यामध्ये पहिल्या नंबरने जो आकडा येतो त्याला तेवढी मते मिळवावी लागतात. उत्तर प्रदेशात एकूण आमदारांची संख्या ४०३ आहे. त्या ठिकाणी ११ जागेवर निवडणूक होत आहे, तर फॉर्म्युला असा असेल 403/ [11+1] +1 = 34 म्हणजेच पहिल्या पसंतीची ३४ मते मिळवावी लागतील.