मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. रोज १ हजारांच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीवर निर्बंध येणार का अशी भीती वारकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत यंदाच्या आषाढी वारीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात टेस्टिंग वाढवण्यात येणार आहे तसेच राज्यात मास्कसक्ती नसली तरीही नागरिकांनी मास्क वापरावा असा आग्रह करण्यात येणार आहे. सध्या तरी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्याचा कोणताही विचार नसल्याचेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.
टोपे म्हणाले की, आगामी काळात पालखी सोहळा निघणार असून, यामध्ये साधारण 10 ते 15 लाख नागरिक एकत्र येतात. यामुळे अधिक कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे योग्य पालन करूनच हा सोहळा साजरा करण्याचे आता सध्या तरी ठरवण्यात आले आहे.
बैठकीमध्ये वारीमध्ये सविस्तर चर्चा पार पडल्याचे टोपे म्हणाले. वारीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या उत्सवामागे लोकांच्या भावना आहेत. त्यामुळे आगामी काळाती होऊ घातलेला वारी उत्सव नक्कीच होईल त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या निर्बंघ लावण्याचा विचार राज्य सरकारचा नसेल, असे आपले मत असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये जरी कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असली तर, रूग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचे प्रमाण हे फारच नगण्य असं आहे. त्यामुळे ही राज्याच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. बाधित होणाऱ्या नागरिकांपैकी केवल 1 टक्के नागरिकांनाच रूग्णालयात भरती होत आहे. मात्र, यामध्ये गंभीर रूग्णांचा अजिबात समावेश नाही.
वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी या सुविधा असणार
पालखी मार्गावर दर ५ किमी अंतरावर शौचालयाची व्यवस्था
१८०० फिरत्या शौचालयाची व्यवस्था
५० टक्के फिरती शौचालये महिलांसाठी राखीव
पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या वतीने सॅनिटायझर, औषधे, डॉक्टरांची सुविधा
वारीच्या मार्गावरील रस्त्याच्या कडेला असणारी मांसाहार, दारूची दुकाने बंद राहणार
वारी काळात एक मोबाइल ऍप तयार करणार
विठ्ठल रुक्मिणी दर्शन लाईव्ह
जादा बसेस सोडणार
२५ हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन वारीत सोडणार
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात
• नाशिक जिल्ह्यातील मौजे काष्टी (ता. मालेगांव) येथे कृषि विज्ञान संकुलांतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरु होणार. (कृषि विभाग)
• मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करुन अर्थसहाय्य देण्याचा निर्णय. (कृषि विभाग)
• मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)
• ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)
• पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या, पाणी पुरवठा योजनांच्या निविदेत भावभिन्नता कलमाचा (Price Variation Clause) समावेश करणे व सध्याच्या अप्रत्याशीत / असाधारण भाववाढीसाठी विशेष सवलत (Special Relief) देण्याचा निर्णय. (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग)
• सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथील नॅशनल सहकारी सूतगिरणी या सहकारी सूतगिरणीची शासन अर्थसहाय्यासाठी निवड. (वस्त्रोद्योग विभाग)