देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन, भाजपच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन

351 0

मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावेळी ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. विधानमंडळाकडूनही विधानसभेच्या सर्व सदस्यांना उद्या होणाऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूला आले असल्यामुळे भाजपने ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.

त्यानंतर मुंबईत दाखल होऊन त्यांनी पक्षनेत्यांशी चर्चा केली. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार आशीष शेलार आदींचा समावेश असलेल्या भाजपच्या शिष्टमंडळाने रात्री उशिरा राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली.

या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभेत मनसेचा एक आमदार आहे. त्या आमदाराच्या पाठिंब्यासाठी फडणवीस यांनी राज यांना फोन केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत देखील मनसेच्या एका आमदाराने भाजपच्या बाजूने मतदान केले होते. उद्या गुरुवारी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मनसे भाजपच्या बाजूने मतदान करणार आहे असे समजते.

उद्या सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन

अखेर राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे. ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही. तसेच सभागृह तहकूब करता येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे, असा सूचनाही राज्यपालांनी पत्रात दिल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर इतर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती दिली आहे. ‘आम्ही सर्व आमदारांना घेऊन बहुमत चाचणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत. आमच्यासोबत असलेले सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील,’ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!