पुणे : पुण्यात पावसानं धुवाधार बॅटिंगला सुरुवात केली आहे. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून राहिले आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी गारा देखील पडल्याचे समजते. दरम्यान अशा वातावरणामध्ये शक्य असल्यास घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन स्थानिक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये झाडपडीच्या घटनेमध्ये चार चाकी वाहनाचे नुकसान झाल्याचे समजते. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाच ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रावर जोरदार पावसाचे सावट राहणार आहे.

त्यानुसार कालपासूनच पावसानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढायला सुरुवात केली आहे.

दरम्यान पुण्यासह ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग, रायगड ,कोल्हापूर ,सांगली ,सोलापूर, सातारा ,अहमदनगर ,नाशिक, धुळे ,उस्मानाबाद ,लातूर ,नांदेड ,बीड आणि औरंगाबाद या राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसणार असल्याचं हवामान खात्याने सांगितला आहे.