गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचे नाव आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा याच्यासोबत जोडले जात आहे. परिणीती राघव चड्ढा यांना डेट करत असून लवकरच दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा सातत्याने रंगत आहे. आता तर प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता हार्डी संधूनेही दोघांना शुभेच्छा देत, दोघांचं नातं कन्फर्म केलं आहे.
डीएनएला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हार्डीने परिणीता लग्न करणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. अखेर परिणीती आपल्या आयुष्यात सेटल होतेय… हे घडतंय, याचा मला प्रचंड आनंद आहे. मी तिला शुभेच्छा देतो, असं हार्डी संधू म्हणाला. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करत परिणीत व राघव चड्ढा दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं होतं.
दिल्लीमध्ये राघव चड्ढा याला परिणीती चोप्रा हिच्यासोबत लग्न कधी करणार हे विचारण्यात आले. यावेळी तो लाजला. इतकेच नाहीतर विमानतळावर परिणीती चोप्रा हिला देखील राघव चड्ढा याच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. मात्र, या प्रश्नांना उत्तर देणे तिने टाळले.
विशेष म्हणजे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा लवकरच पार पडणार असल्याची चर्चा असून तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली येथे राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा पार पडणार असे सांगितले जातंय. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पुढच्या महिन्यात परिणीती आणि राघव यांचा रोका म्हणजे लग्नापूर्वी असलेली एक विधी पार पाडणार असल्याची देखील चर्चा रंगत आहे.आता तर दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे आणि त्यांचे अनेक कॉमन फ्रेन्ड्स आहेत. परिणीती चोप्रा नुकतीच राघव चड्ढांसोबत मुंबईत स्पॉट झाली होती. दोघेही एकत्र डिनर डेट एन्जॉय करताना दिसले होते. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. मात्र, परिणीती आणि राघव यांनी अद्याप या वृत्तांवर अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.