‘श्रीं’च्या निरोपासाठी पुण्यनगरी सज्ज ! 8 हजार पोलिसांच्या फौजफाट्यासह 1200 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात

347 0

पुणे : उद्या शुक्रवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी सज्ज झाली असून गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पुणे पोलिसांकडून संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज दिली.

शुक्रवारी सकाळपासून 8000 पोलिस कर्मचार्‍यांच्या तैनातीचं नियोजन करण्यात आलं असून त्याचं नेतृत्व पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली केलं जाणार आहे. चार अतिरिक्त आयुक्त, 10 उपायुक्त, 23 हून अधिक सहायक आयुक्त आणि 138 पोलिस निरीक्षक यांच्यासह सुमारे 625 सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच 7500 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.

शहरात पाळत ठेवण्यासाठी 1200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून गणेश विसर्जनाच्या महत्त्वाच्या मिरवणुकीच्या मार्गांवरही अनेक अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, असंही अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.

पुण्याच्या मध्यवर्ती भागातील विविध रस्ते जे मुख्य मिरवणुकीचा भाग आहेत ते रस्ते मिरवणुकीला सुरुवात झाल्यापासून संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असणार असून अन्य मार्गे वाहतूक वळवण्यात येणार आहे. उद्या पुण्यातील कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील आणि कोणत्या मार्गे वाहतूक वळवली जाईल याबाबत पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी माहिती दिली.

शहरातील विविध ठिकाणी रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या स्टँडबाय ठेवण्यात येणार आहेत शिवाय शहरात ठिकठिकाणी वॉच टॉवर देखील उभारण्यात येणार आहेत. उद्या 2969 सार्वजनिक गणपती तसेच 2 लाख 22 हजार 977 घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!