पुण्याची प्रभाग रचना पुन्हा नव्यानं! तीन की चार सदस्यीय असेल प्रभाग रचना याबाबत मात्र संभ्रम !

440 0

महाराष्ट्र : पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई महापालिकेसह राज्यातील 24 महापालिका निवडणुकांसाठी या सर्व महापालिकांची प्रभाग रचना नव्यानं करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळं नवीन वर्षात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झालीये. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक तीन ऐवजी चार सदस्यीय पध्दतीनं होण्याची जरी शक्यता दिसत असली तरी या आदेशात प्रभागरचनेची सदस्य संख्या स्पष्ट करण्यात आली नसल्यानं संभ्रम निर्माण झालाय.

मुदत संपलेल्या आणि नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी 2011 च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या व रचना निश्चित करून प्रभागरचनेचं प्रारूप तयार करण्याचं काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश नगरविकास विभागानं संबंधित महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

पुणे महापालिकेसाठी 2017 प्रमाणं चार सदस्यीय प्रभाग रचना झालीच तर नगरसेवकांची संख्या 167 होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत 11 गावं समाविष्ट झाल्यानंतर 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत दोन सदस्यांची वाढ होऊन ती 164 झाली होती. आता नव्यानं समाविष्ट झालेल्या 23 गावांतील लोकसंख्येचा विचार करता आणखी तीन सदस्य वाढून ही सदस्य संख्या 167 च्या घरात जाईल आणि प्रभागांची संख्या 42 होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्य सरकारनं प्रभाग रचना नव्यानं करण्याचे आदेश दिल्यानंतर पुण्याची प्रभागरचना नेमकी कशी असेल याबाबत TOP NEWS मराठीनं पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता राहिलेले उज्ज्वल केसकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काय म्हणाले उज्ज्वल केसकर ? पाहूयात…

पुणे महापालिकेची मुदत 15 मार्च रोजी संपल्यानंतर राज्य सरकारनं महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. यापूर्वीची तीन सदस्यीय प्रभाग रचना त्यांनीच केली होती मात्र त्यावेळी रचनेत हस्तक्षेप झाल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता आणि आता पुन्हा विक्रम कुमार यांच्याच नेतृत्वाखाली नव्यानं प्रभाग रचना होणार आहे. एकूणच काय तर कधी तीन कधी चार या आकड्यात अडकलेली प्रभाग रचना नेमक्या कोणत्या आकड्यावर फायनल होणार हे चित्र स्पष्ट व्हायला पुणेकरांना आणखी थोडी कळ सोसावी लागणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!