#पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

984 0

पुणे : हवामान विभागाने पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले असल्याने पुणे महानगरपालिकेने आतापासून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी, असे असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

शासकीय विश्रामगृहात जायका, २४ x ७ पाणी पुरवठा योजना आणि पुणे शहरातील पाणी समस्येबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रविंद्र बिनवडे, विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

मैलापाणी शुद्धीकरणासाठी नवीन प्रकल्प उभारण्यासोबत अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. कालबद्ध पद्धतीने जायका प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करावे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रीया केल्यानंतरचे पाणी औद्यागिक क्षेत्राला देऊन तेवढ्या प्रमाणात औद्योगिक कारणासाठी दिले जाणारे पाणी शहरासाठी वापरण्याच्या शक्यतेबाबत अभ्यास करावा.

समान पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी करताना इलेक्ट्रोमॅग्नेटीक फ्लोमीटरमुळे निदर्शनास आलेली पाणी गळती कमी करण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत. कमी पाणी मिळत असलेल्याची तक्रार असलेल्या भागात पाणी पुरवठा सुरळीत होईल यासाठी तेथील कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री.पाटील यांनी दिले.

समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी साठवण क्षमता २३ टक्क्यापासून ३३ टक्क्यापर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी २८७ द.ल.लिटर क्षमतेच्या ८२ नव्या टाक्या उभारण्यात येणार असून त्यापैकी ४३ ची कामे पूर्ण झाली आहेत, तर १२ टाक्यांचा उपयोग सुरू करण्यात आला आहे. २१ टाक्यांची कामे सुरू आहेत. पाण्याचे ऑडीट करण्यासाठी २४६ पैकी २३५ इलेक्ट्रोमॅग्नेटीक फ्लोमीटर बसविण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जायका प्रकल्पांतर्गत नवे ११ शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे ३९६ द.ल.लिटर मैलापाणी शुद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी १९ ठिकाणी ५५ किलोमीटरच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. अमृत योजनेतून जुन्या प्रकल्पांची क्षमता वाढ करण्यात येणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!