वाघ, सिंह व गेंड्याच्या बछड्याना स्वतःच्या हातांनी दूध पाजले
जामनगर, ४ मार्च २०२५: जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जामनगरमध्ये उभारलेल्या वन्यजीव संरक्षण केंद्र ‘वनतारा’चे उद्घाटन केले. वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी समर्पित असलेल्या या केंद्रात त्यांनी बराच वेळ घालवला आणि प्राण्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधांची पाहणी केली. वनतारा ही प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे.
वनतारात आगमन होताच अंबानी कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने पंतप्रधानांचे स्वागत केले. शंखध्वनी, मंत्रोच्चार आणि लोककला सादरीकरणाच्या वातावरणात नरेंद्र मोदी यांनी वनतारा केंद्राचे उद्घाटन केले. तसेच, परिसरातील मंदिरात जाऊन त्यांनी विधीपूर्वक पूजा-अर्चा केली. पंतप्रधानांनी प्राण्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली. त्यांनी तिथे सीटी स्कॅन, MRI, अल्ट्रासाऊंड आणि एंडोस्कोपी यांसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिले. प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या ICU आणि ऑपरेशन थिएटरलाही त्यांनी भेट दिली. येथे नव्याने जन्मलेल्या प्राण्यांच्या देखभालीसाठी खास नर्सरीही तयार करण्यात आली आहे. वनतारामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची त्यांनी विशेष प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी आशियाई सिंहाचा बछडा , पांढऱ्या सिंहाचे बछडा आणि अत्यंत दुर्मिळ क्लाऊडेड बिबट्या शावकांचे निरीक्षण केले. त्यांनी स्वतःच्या हातांनी पांढऱ्या सिंह, बाघ आणि गेंड्याच्या बछड्याना दूध पाजले. येथे आशियाई सिंह, हिम बिबट्या आणि एकशिंगी गेंडा यांसारख्या दुर्मिळ प्राण्यांचे संवर्धन केले जाते. याशिवाय, त्यांनी गोल्डन टायगर, पांढरा सिंह आणि हिम बिबट्या यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांनाही जवळून पाहिले. वनतारातील प्रत्येक प्राण्याला त्यांच्या गरजेनुसार नैसर्गिक अधिवासासारखे घर मिळाले आहे. येथे ‘किंगडम ऑफ लॉयन्स’, ‘किंगडम ऑफ रेप्टाइल्स’, ‘किंगडम ऑफ सील’, ‘चीता ब्रीडिंग सेंटर’ यांसारखी विशेष केंद्रे उभारण्यात आली आहेत.
मात्र, वनताराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘गजनगरी’, जी सुमारे १००० एकरमध्ये पसरलेली आहे. येथे २४० हून अधिक वाचवलेले किंवा आजारी हत्ती निवारा घेतात. अत्याचार व दुर्लक्षाला बळी पडलेल्या हत्तींसाठी येथे जागतिक स्तरावरील पशु चिकित्सा उपचार व काळजी घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. वनतारामध्ये जगातील सर्वात मोठे हत्ती रुग्णालय आहे, जे हत्तींसाठी जलतरण तलाव, जकूजी यांसारख्या विशेष सोयीसुविधांनी सुसज्ज आहे.