फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांना क्लीन चिट देण्यास कोर्टाचा नकार

252 0

पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या सीआरपीएफच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होताना दिसतेय. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी एक धक्कादायक खुलासा केल्यानं या प्रकरणाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा नव्यानं चौकशी करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयानं दिले आहेत.

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी चौकशी दरम्यान रश्मी शुक्ला यांनी आम्हाला फोन टॅपिंग करायला लावल्याचं म्हटलं आहे. मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान फोन टॅपिंग करण्यात आले होते. 2021 मध्ये हा मुद्दा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून रश्मी शुक्ला यांनी आपला फोन टॅप केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या फोन टॅपिंग प्रकरणात भाजपचे काही बडे नेते, राष्ट्रवादीचे काही नेते आणि काँग्रेसचे नाना पटोले यांची नावं आहेत.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. त्यावेळी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे हे चौकशी समितीचे प्रमुख होते. समितीच्या तपासानंतर पुण्याच्या पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी 25 फेब्रुवारी 2022 रोजी पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली परंतु जुलै 2022 मध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी रश्मी शुक्ला यांना याप्रकरणी क्लीन चिट देत पुणे न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला मात्र कोर्टानं क्लोजर रिपोर्ट फेटाळला आणि रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट देण्यास नकार दिला.

Share This News
error: Content is protected !!