पुणे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पेन ड्राईव्ह प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील माजी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्ह नंतर अधिवेशनात गदारोळ झाला होता. राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा फैरी झाडल्या गेल्या. त्यामुळे प्रवीण चव्हाण यांनी काल राजीनामा दिला.
प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये केलेलं स्टिंग हे तेजस मोरे यांनी केल्याचा चव्हाण यांनी आरोप केला आहे. गोपनीयता भंग, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा याचा भंग केल्याने गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार चव्हाण यांनी केली आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर अनेक आरोप केले होते. ते आरोप फेटाळून लावत तेजस मोरे या त्यांच्या आशिलाने कॅमेरा असलेलं घड्याळ त्याच्या ऑफिसमध्ये लावल्याचं चव्हाण यांनी सांगितले आहे.
”हे घड्याळ त्यानेच आणलं होतं. आधी त्याने एसी लावण्याचा प्रयत्न केला त्याला मी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर स्मार्ट टीव्ही लावण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला. मी मुंबईला गेलेलो असताना त्याने हे घड्याळ इथे लावलं ” असे चव्हाण यांचे म्हणणे आहे.
”मी त्याला म्हटलं होतं हे घड्याळ इथे लावण्याची गरज नाही. त्याने नंतर काढतो असं सांगितलं. माझ्याकडे वेळ नव्हता. इतर केसेससाठी मी नागपूर आणि इतर ठिकाणी जात असतो. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने स्टिंग ऑपरेशन द्वारे मॅन्यूपुलेशन केले आहे. त्यामध्ये ओव्हरलॅपिंग, लिपसिंग अश्या इतर बाबी करण्यात आल्या आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले आहे”
कोण आहे तेजस मोरे ?
राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या पेन ड्राईव्ह प्रकरणात ज्या वकिलांवर आरोप झाले त्या प्रवीण चव्हाण यांनी ते रेकॉर्डिंग तेजस मोरे या तरुणानं केल्याचा दावा केलाय. हा तेजस मोरे उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आलीय. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण मूळचा जळगावचा आहे आणि गेली अनेक वर्षे तो पुण्यात राहतोय.