पाकिस्तान : कराचीमध्ये पोलीस मुख्यालयावर हल्ला; पोलीस आणि हल्लेखोरांमध्ये अंदाधुंद गोळीबार, “पाकिस्तान दहशतवादाला मुळातून संपवेल..!”

907 0

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये एका मशिदीवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये 100 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता पाकिस्तानातील कराची मधल्या पोलीस मुख्यालयात सहा ते सात जणांनी हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला असून, सध्या पोलीस मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हे हल्लेखोर असल्याचे समजत तिथून ते गोळीबार करत आहेत.

पाकिस्तानातील एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सिंध प्रांताच्या सरकारशी संपर्क ठेवला आहे. आणि सर्व प्रकारची मदत देण्यासाठी तयार आहे. सध्या पोलीस मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हल्लेखोर असून तिथून गोळीबार करत आहेत. हल्लेखोर ज्यावेळी पोलीस मुख्यालयात पोहोचले तेव्हा वाहन पार्क केल्यानंतर हॅन्ड ग्रेनेड ही फेकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या कराची पोलीस आणि या हल्लेखोरांमध्ये गोळीबार सुरू आहे. तसेच हल्लेखोर हॅन्ड ग्रेनेडचाही वापर करत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी इमारतीची वीज बंद केली आहे. तसेच इमारतीत प्रवेश करण्याचे सर्व मार्ग देखील बंद करण्यात आले आहेत.

स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सिंध प्रांताचे माहिती आणि प्रसारण मंत्री शर्जील इमाम यांनी सांगितले आहे की, हल्लेखोर नेमके किती संख्येत आहेत याची नेमकी माहिती आमच्याकडे नाही…!

तर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी एक ट्विट केले असून लिहिले आहे की, “कराची पोलिसांवरील हल्ल्याचा मी निषेध करतो. इतिहासात सिंध पोलिसांनी दहशतवादाचा मोठ्या शौर्याने सामना केलाय आणि दहशतवाद्यांना पराभूतही केले. आम्हाला सिंध पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. ते याही वेळेस दहशतवाद्यांना पराभूत करतील असे भ्याड हल्ले आम्हाला रोखू शकत नाहीत.

तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कराची पोलीस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. ते म्हणाले की, पाकिस्तान दहशतवादाला मुळातून संपवेल. कराची पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध नोंदवतो. आणि हल्ल्याला यशस्वी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सलाम करतो. पाकिस्तान केवळ दहशतवादाला मुळातून संपवणार नाही तर दहशतवाद्यांना न्यायालयाच्या चौकटीत आणून त्यांनाही संपेल असेही पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!