पुणे : औंध, बोपोडी भागातील काही सोसायट्यांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत त्यांच्यासाठी पिण्याचे पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहेत. मात्र वाहतूक कोंडीचे कारण सांगत वाहतूक पोलिसांकडून हे टँकर अडवण्यात येत आहेत. पाणी ही अत्यावश्यक वाहतूक सेवा असल्याने पाण्याचे टँकर अडवण्यात येऊ नये अशी विनंती पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडे भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी केली. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी दिला आहे.
सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, औंध –बोपोडी परिसरात पिण्याचे पाणी कमी दाबाने येते. या भागातील सोसायटी धारकांना दररोज पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही. याबाबत स्थानिक नागरिकांकडून आमच्याकडे तक्रारी येत आहेत. येथील लोकांची पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होण्यासाठी पुणे महानगरपालिके मार्फत त्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवण्यात येत आहेत.
मात्र वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी होत असल्याच्या कारणावरून हे टँकर अडवले जात आहेत. यामुळे लोकांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. लोकांना गरज असताना पाणी मिळत नसल्याने याबद्दल लोकांची संतप्त भावना आहे. तरी कृपया पाणी वाहतूक ही अत्यावश्यक सेवा असल्याने हे पाण्याचे टँकर न अडवण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना तातडीने द्यावेत. अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास येथील नागरिकांसह आंदोलन करण्याचा इशारा ही त्यांनी यावेळी दिला आहे.